सचिन वाझेची रवानगी तळोजा कारागृहात

मुंबई : २७ दिवसाच्या एनआयए कोठडीनंतर न्यायालयाकडून सचिन वाझे याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझे यांच्या वकिलांनी सचिन वाझे यांना तुरुंगातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे अशी विनंती वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात केली असता न्यायालयाने ती मान्य केली आहे. दरम्यान सायंकाळी सचिन वाझे याची रवानगी तळोजा तुरुंगात केली असून न्यायालयाच्या आदेशाची प्रत तुरुंगाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तब्बल २७ दिवस तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर सचिन वाझे याची तपास यंत्रणेच्या कचाट्यातून तात्पुरती सुटका झाली असून एनआयए न्यायालयाने सचिन वाझेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएकडून पुन्हा वाझे याचा ताबा घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक करण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ ठेवल्याप्रकरणी १३ मार्च रोजी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडून मुंबई पोलीस दलातील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. पाच वेळा एनआयए कडून त्याची एनआयए कोठडी वाढवून घेण्यात आली होती तब्बल २७ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर शुक्रवारी सचिन वाझे याची एनआयए कोठडी संपल्यामुळे वाझेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान एनआयएने सचिन वाझेच्या पत्राबाबत न्यायालयात आक्षेप घेत हे पत्र बाहेर कसे पडले याबाबत न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. न्यायालयाकडून वाझे याचे वकिलांना या बाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. दरम्यान वाझेच्या भावाकडून वाझे याची प्रकृती ठीक नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. मात्र एनआयएने सचिन वाझे याची प्रकृती ठणठणीत असून त्याला कुठल्याही उपचाराची गरज नसल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अगोदरच अटक करण्यात आली होती, मनसुख हिरेन याच्या हत्येचा कटातील मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे उघड झालेले आहे. या हत्येचा तपास देखील एनआयए करीत असून सचिन वाझे याला या गुन्हयात मुख्य आरोपी बनवून त्याला या गुन्हयात अटक करण्यासाठी एनआयए सचिन वाझे याचा ताबा न्यायालयाकडे मागू शकते अशी शक्यता आहे.