
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.
अमित ठाकरे यांनाही कोरोना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथेच त्यांच्यावर पुढील १४ दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिला आहे. अमित ठाकरे यांना दोन-तीन दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांची काल चाचणी करण्यात आली. आज दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.




