सचिन वाझेंची कोठडीत चौकशी करण्याची गरज; कोर्टाच्या गंभीर आक्षेपांमुळे अडचणी वाढल्या

ठाणे : वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर अटकेची तलवार आहे. “वाझेंच्या विरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, त्यांच्या कोठडीतील तपासाची गरज आहे,” अशा गंभीर नोंदी कोर्टाने नोंदविल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सचिन वाझे (API Sachin Vaze ) यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला आहे. त्यामुळे वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वाझे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीन मागितला. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.
कोर्टाने आपल्या आदेशात वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे. दुसरीकडे एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. म्हणूनच अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं कोर्टाने नमूद केलं.
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहेच. शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा NIA कडूनही तपास होत आहे. सध्या एटीएसच्या तपासाला गती मिळाल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण एटीएसने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची काल पुन्हा एकदा तब्बल नऊ तास चौकशी केली. तर त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदरहून ठाण्यात आणणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचीही काल चौकशी करण्यात आली.