मास्को : युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियानं नागरी वस्त्यांमध्ये हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या या लष्करी कारवाईचा जगभरातून निषेध होत आहे. दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्त्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली होती. अनेक तास चाललेल्या बैठकीत प्रश्न सुटला नाही. मात्र पुन्हा एकदा रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी आज २ मार्च रोजी पार पडणार आहे. रशियाच्या तास वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतील चर्चेंनंतर आता दूसऱ्या फेरीतील चर्चेकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
याआधीही युक्रेनने तत्काळ युद्ध थांबवण्याची आणि युक्रेनमधून रशियन सैनिकांना माघार घेण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर युक्रेनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष सत्र सुरू आहे. बहुतेक देशांनी रशियाने हल्ला थांबवण्याचा आणि चर्चेतून या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
रशिया हा दहशतवादी देश आहे. रशियाचा हल्ला म्हणजे हा दहशतवादच आहे. रशियाच्या हल्ल्यात काल युक्रेनमधील १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आमचे नागरिक या हल्ल्याची किंमत चुकवत आहेत. पण आमचा लढा स्वातंत्र्यासाठी असून आम्हाला इतर देशांचा पाठिंबा मिळत आहे. पण रशियाची ही वागणूक ना कोणी माफ करणार, ना कोणीही विसरेल, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं.
झेलेन्स्की म्हणाले की, ही माझ्यासाठी, प्रत्येक युक्रेनी नागरिकासाठी, आमच्या देशासाठी एक मोठी आपत्ती आहे. मला आनंद आहे की, आम्ही आज तुम्हा सर्वांना, युरोपियन युनियनच्या देशांना एकजूट केले आहे. मात्र मला हे माहिती नव्हते की, याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल. रशिय़ाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंस होत असून अनेक शहरं बेचिराख होत आहेत. नागरिकांचा आत्मविश्वास वाढवून आपण लढा कायम ठेवणार हे सांगताना झेलेन्स्की म्हणाले, आमचा लढा आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे. आमची सर्व शहरं घेरली असली तरी आम्हाला कोणीच तोडू शकत नाही. आम्ही ताकदवर आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत, असं झेलेन्स्की यावेळी म्हणाले.
आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.
झेलेन्स्की यांनी युरोपला मदतीचं आवाहन देखील केलं आहे. आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की आम्ही देखील तुमच्यासारखेच आहोत. त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं. झेलेन्स्की यांचे संबोधन पूर्ण झाल्यानंतर युरोपियन युनियनच्या सदस्यांनी उभे राहून टाळ्या त्यांना मानवंदना दिली.
युरोपियन युनियनमध्ये युक्रेन होणार सामील
रशिया आणि युक्रेन वाद शिगेला पोहोचला असताना युरोपियन युनियनच्या संसदेने युक्रेनचा अर्ज मंजूर केला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी सोमवारी २७ सदस्यीय युरोपीय संघमध्ये युक्रेनला सदस्य बनवण्यासाठी अर्ज केला होता. हाच अर्ज आता युरोपियन युनियनने स्वीकारला आहे.
दरम्यान, युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेता आलेली नाही. किव्हवर हल्ले करणाऱ्या रशियावर युक्रेनच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
राजधानी किव्ह ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेनच्या फौजा हाणून पाडताना दिसत आहेत. युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याला जोरदार दणका दिला आहे. पाश्चिमात्य देशांकडून मिळालेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या मदतीनं युक्रेनी सैन्यानं रशियन लष्कराचं मोठं नुकसान केलं आहे. युक्रेनमधल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी रशियाचे रणगाडे, तोफ, शस्त्रसज्ज वाहनं उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत दिसत आहेत. मात्र यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सैन्याला माघारी बोलावण्यास तयार नाहीत.
रशियन सैन्याने उडवले टीव्ही टॉवर
रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हमधील एका सरकारी इमारतीला उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रशियाने किव्हमधील आणखी एका सरकारी संपत्तीचे नुकसान केले आहे.
रशियन सैन्याने राजधानी किव्हमधील मुख्य टीव्ही टॉवरला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे अनेक टीव्ही चॅनेल्सच्या प्रक्षेपणावर परिणाम झाला आहे. युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खारकीवलाही लक्ष्य केले आहे. रशियाने निवासी भागांवर हल्ले केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
रशियन सैन्य आपले टँक आणि इतर लष्करी वाहने घेऊन युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये घुसले आहेत. आज सकाळी रशियन रणगाड्यांनी खारकीव आणि राजधानी किव्ह दरम्यान वसलेल्या ओक्टिर्का शहराच्या लष्करी तळावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात ७० हून अधिक युक्रेनचे सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय, युद्धामुळे सहा लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. लाखो लोकांनी जीव वाचवण्यासाठी भूमिगत मेट्रो स्टेशन, बंकर आणि इतर आश्रयस्थानांचा आसरा घेतला आहे.
भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल मोदींना शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये चर्चा झाली. यादरम्यान, युक्रेनच्या खारकीवमध्ये झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ट्विटरवर या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी संभाषणात खारकीवमध्ये रशियन हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युरोपीय देश मनापासून मदत करत आहेत.
रशियन सैन्याने खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. दरम्यान, , युक्रेनमधील खारकीव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव असून, तो अवघ्या २१ वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता.
भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शरद पवारांचा संताप
युक्रेनची राजधानी किव्हवर काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला जे काही मिळेल ते वापरुन किव्ह सोडण्यास सांगितले आहे. कारण, रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमावाला लागला आहे. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे भारतीय पालकांची काळजी वाढली असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ट्विट करुन केद्र सरकारला परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिलाय. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखापुरा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. अद्यापही रशियात हजारो आपले भारतीय विद्यार्थी अडकले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत. काहींना जेवणही मिळेना झालंय. केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावं, युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता गतीमान प्रकिया रावबली पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले आहे. तसेच, भारत सरकारने लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, असेही पवार म्हणाले.
प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
रशियन सैन्याच्या हल्ल्यात आज एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमावाला लागला आहे. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त होत असतानाच आता खा. सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘माझं केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की, प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय प्रसिद्धी करायची ती करा. ही प्रसिद्धी आणि राजकारण करण्याची वेळ नाही’, असे सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, राजकीय नेत्यांच्या विधानावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांचे जीव धोक्यात असताना हे लोक अशी असंवेदनशील, बेजबाबदार आणि निष्ठूर विधाने करीत आहेत, हे खेदजनक आहे, असेही त्यांनी म्हटलंय.
युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. शरद पवार यांनी काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन देखील केला होता. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. दुर्दैवाने आपण आज भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत. ही घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, कृपया कृती करा. परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.