नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सोमवारी, ६ डिसेंबरला अत्यंत छोट्या पण महत्त्वाच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत. अवघ्या काही तासांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा ते अंतराळ तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रासह जवळपास डझनभर करारांवर शिक्कामोर्तब होणार आहेत.
रशियाचे अध्यक्ष पुतिन दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त ६-७ तास भारतात असतील. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता मोदी आणि पुतिन यांच्यात बैठक होईल. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अनौपचारिक चर्चेाही होऊ शकते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर पुतीन उद्याच रात्री साडेनऊच्या सुमारास रशियाला रवाना होतील.
भारत-रशिया शिखर परिषदेच्या तयारीशी संबंधित अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. भारताला मध्य आशिया आणि रशियाशी जोडण्याचा मार्ग देणारा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण व्यापार कॉरिडॉर सारख्या सर्वसमावेशक प्रकल्पाला पुढे नेण्याबद्दल चर्चा होईल. भारताने यापूर्वीच इराणमध्ये बांधलेल्या चाबहार बंदराला आयएनएसडीसीशी जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेत एके-२०३ असॉल्ट रायफलच्या संयुक्त उत्पादन करारावरही शिक्कामोर्तब होणार आहे. या अंतर्गत भारतातील अमेठी येथे ५ लाखांहून अधिक एके-२०३ प्रगत रायफल्सचे उत्पादन केले जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीपूर्वी, भारतातील सुरक्षा-संबंधित बाबींवर सरकारची सर्वात शक्तिशाली संस्था असलेल्या सीसीएसने कराराच्या मसुद्याला मान्यता दिली. या रायफल निर्मिती प्रकल्पासाठी इंडो-रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय कंपनी अॅडव्हान्स वेपण अॅण्ड इक्विपमेंट इंडिया लि. आणि रशियाच्या रॉसबोर्न एक्स्पोर्ट आणि कालाश्निकोव्ह सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.