हेडिंग्ले : २०२१ कॅलेंडर वर्षात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला रोखणं जरा अवघडच आहे. विराट कोहलीसारखा आक्रमकपणा हावभावात नसला तरी रूटच्या फलंदाजीत आक्रमकतेची उणीव जाणवली नाही. यंदाच्या वर्षातील सहावे कसोटी शतक, त्यापैकी तीन शतकं ही याच मालिकेतील.. सलग तीन शतकं दोन वेळा झळकावणाऱ्या रूटनं टीम इंडियाविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात इंग्लंडला मोलाची मदत केली आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांची अर्धशतकं अन् रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं टीम इंडियावर पराभवाचं संकटच लादलं आहे. इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा करताना पहिल्या डावात ३४५ धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या कसोटीची सुरुवातच भारतासाठी खराब झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. पण पहिल्या डावात टीम इंडिया केवळ 78 धावांत गारद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. भारताला ७८ धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने काल (पहिल्या) दिवसअखेर बिनबाद १२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. कर्णधार जो रुटच्या शतकी (१२१) खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला ३४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
इंग्लंडकडून आतापर्यंत या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने ६१ धावांची खेळी केली तर हासीब हमीदने ६८ धावांची खेळी केली. या दोघांनी १३५ धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलाने ७० धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलद तिसरं शतक ठोकलं. त्याने १४ चौकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिवसअखेर क्रेग ओव्हरटन (२४) आणि ऑली रॉबिन्सन (०) नाबाद आहेत.
फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातं उघडता आलं नाही.
तत्पूर्वी भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या ७८ धावांवर तंबूत परतले.
जो रूट एकटा भिडला
या कॅलेंडर वर्षात रूटनं आतापर्यंत १३६६ धावा केल्या आहेत आणि २०१५ नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कॅलेंडर वर्षात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. अॅलेस्टर कूकनं २०१५ मध्ये १३६४ धावा केल्या होत्या. जो रूटनं कसोटीतील २३ वे शतक पूर्ण केले. यंदाच्या वर्षातील हे त्याचे सहावे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक ठरले. विशेष म्हणजे रूटनं या मालिकेत तीन शतकं झळकावली. कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं डेवीड मलानसह इंग्लंडचा डाव सावरताना संघाची आघाडी आणखी मजबूत केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. २०१२ च्या कोलकाता कसोटीनंतर प्रथमच इंग्लंडच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली आहे.