
किल्ले रायगड : संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सानथोरांपासून सर्वांनाच ज्ञात. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा रविवारी किल्ले रायगडावर साजरा होत आहे.
याच खास दिवसाचं औचित्य साधत सुमारे ३५० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘सुवर्ण होनांनी’ अभिषेक करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘होन’ सुपूर्द होणं हा एक सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार संभाजीराजे भोसले यांनी ‘होन’ सुपूर्द करण्यात येणार असल्याने हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्ण क्षण असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मागील वर्षी इथं विशेष परवानगी घेण्यात आली होती. यंदा देखील हा सोहळा अवघ्या काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितच साजरा करण्यात येणार असून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार होणारे सर्व कार्यक्रम होणार आहेत. तर, शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करीत कोरोनाच्या महामारीमुळे शिवप्रेमींना घरूनच शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




