लालूंच्या पक्षात जीन्स घालणाऱ्यांना ‘नो एन्ट्री’?
पटना : लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने अजब विधान केलं आहे. जीन्स पँट घालणाऱ्यांना राजकारण काय कळतं? ते काय राजकारण करणार?; असा सवाल या नेत्याने केला आहे. एवढंच नव्हे तर जीन्स घालणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचं धक्कादायक विधानही या नेत्याने केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजदचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
जातीवर आधारित जनगणना सुरू करण्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जीन्स पँट घालणारे राजकारण करू शकत नाही. आमचा पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांचा पक्ष आहे. संघर्ष करणाऱ्यांचा पक्ष आहे. जे लोक जीन्स घालतात ते कधीच नेता बनू शकत नाही, असं जगदानंद सिंह यांनी सांगितलं.
जे लोक निदर्शने करत नाहीत ते संघाचे कार्यकर्ते आहेत. ते आमच्यामध्ये घुसले आहेत, असं सांगतानाच तुम्ही चित्रपटाची शुटींग करण्यासाठी आला आहात का? राजकारण करायला आला आहात तर निदर्शनामध्ये सामील व्हा. आंदोलन करायला शिका. ही तरुण नेत्यांच्या प्रशिक्षणाची वेळ आहे, असं ते म्हणाले.
आपला अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यासाठी आपल्याला मोठी लढाई लढावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. जातीवर आधारित जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, बॅकलॉग भरावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना इन्कम टॅक्स चौकात अडवलं. त्यानंतर जगदानंद यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. मात्र, पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन करावं यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागला. तुम्ही लोक सतत फोटो काढण्याच्या फंदात अडकलेले असतात. आंदोलनात बसा नाही तर तुम्ही आरजेडीचे कार्यकर्तेच नाही, असं आम्ही समजू, असा दमच त्यांनी या तरुणांना भरला. त्यानंतर हे तरुण कार्यकर्ते आंदोलनात बसले.