नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी असून कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच थांबवायला हवी. यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लस ही रणनीती प्रत्येक राज्यानं राबवायला हवी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांनी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसंच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील सहभागी झाले होते.
कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारांनी एकमेकांकडून शिकण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सध्या अशा वळणावर येऊन पोहोचलोय जिथे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे वाढते प्रकरण चिंतेचा विषय आहे. गेल्या एका आठवड्यातील सुमारे ८० टक्के प्रकरणे या ६ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, केरळमधील वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहत. पुन्हा एकदा आपल्याला टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरणाणाच्या धोरणावर पुढे जावं लागेल, असं मोदी म्हणाले.
जिथे जास्त संक्रमण आहे तिथे लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे. चाचणीमध्ये आरटी-पीसीआर तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर दिला जावा. सर्व राज्यांमध्ये आयसीयू बेड, चाचणी क्षमता वाढविण्यासाठी निधी देण्यात येत आहे. केंद्राने २३ हजार कोटींचा निधी दिला आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोनापासून मुलांना वाचवण्यासाठी सर्व तयारी करणं आवश्यक आहे. गेल्या दोन आठवड्यांत, युरोपमधील देशांमध्ये कोरोनाची संख्या वाढत आहे, अमेरिकेतही प्रकरणे वाढत आहेत. हा आपल्यासाठी एक इशारा आहे असं सांगत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी थांबवावी लागेल, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.