
नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने विराट कोहलीच्या ऐतिहासिक १०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली वातावरण निर्मिती केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ६ गडी गमावून ३५७ धावा केल्यात. टीम इंडिया आणि त्याच्या चाहत्यांना विराट कोहलीकडून शंभराव्या कसोटीत शतकाची अपेक्षा होती, पण या आनंदावर विरजण पडलेय. त्यानंतर पंतचे वादळ मैदानात आले, ज्याने शेवटच्या सत्रात जोरदार फलंदाजी करत श्रीलंकेला संधीच दिली नाही. परंतु पुन्हा एकदा तो शतक पूर्ण करू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी आलेल्या हनुमा विहारीनेही चांगली अर्धशतकी खेळी केली.
मोहाली येथे शुक्रवारपासून सुरू झालेला सामना दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक ठरला. भारताकडून विराट कोहलीची ही १०० वी कसोटी होती, तर नवीन कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच कसोटी होती. त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेट संघाची ही ३०० वी कसोटी होती. अशा स्थितीत पहिल्या दिवशीही सामना चांगलाच रंगला, जिथे भारताने बऱ्याचदा वर्चस्व गाजवले, तर फिरकीपटू लसिथ अंबुलडेनियाच्या जोरावर श्रीलंकेनेही मध्येच धक्के दिले.
रोहित शर्माने आपल्या पहिल्याच कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि मयंक या जोडीने केवळ ५९ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये रोहित धावा करीत राहिला. पण हा वेग त्याच्यावरच भारी पडला आणि तो २९ धावा (२८ चेंडू) करून लाहिरू कुमाराचा बळी ठरला. मयंक अग्रवाल (३३) यानेही चांगली सुरुवात केली, मात्र त्यालाही डावाचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही आणि त्याचा अंबुलडेनियाने पहिला बळी मिळवला.
या सामन्यात सर्वांच्या नजरा माजी कर्णधार विराट कोहलीवर होत्या. त्याच्या १०० व्या कसोटीचा साक्षीदार होण्यासाठी मोहाली स्टेडियमवर मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकाची एकच इच्छा होती, १०० व्या कसोटीत शतकाची. कोहलीकडून लंचपूर्वी आणि उपाहारानंतर आशा उंचावल्या. या अनुभवी भारतीय फलंदाजाने चांगली सुरुवात करत हनुमा विहारीसोबत शानदार भागीदारी केली. पण मागील अनेक डावांप्रमाणेच पुन्हा एकदा सेट झाल्यानंतर कोहलीने विकेट गमावली. डावखुरा फिरकीपटू अंबुलडेनियाने एका चांगल्या चेंडूवर त्याला चकवले आणि बळी मिळवला. त्याने ७६ चेंडूत ४५ धावा केल्या आणि विहारीसोबत ९० धावांची भागीदारी केली.
कोहली बाद होताच विहारीनेही झटपट विकेट टाकली, पण विहारीने विकेट गमावण्यापूर्वी टीम इंडियाला आशेचा किरण मिळवून दिला. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विहारीने पहिल्याच डावात आपल्या दमदार खेळाने दाखवून दिले की, तो या खेळात स्थानावर दीर्घकाळ टिकून राहू शकतो. विहारीने आपले पाचवे अर्धशतक झळकावले, मात्र ५८ धावांवर विश्वा फर्नांडोचा बळी गेला.
कोहलीनंतर ऋषभ पंत पहिल्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण ठरला. अंबुलडेनियाच्या फिरकीचा सामना करण्यासाठी पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलेल्या पंतने चांगली खेळी केली. डावखुऱ्या भारतीय फलंदाजाने प्रथम श्रेयस अय्यर (२७) सोबत ५३ धावांची भागीदारी केली आणि लवकरच आठवे अर्धशतक झळकावले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पंत अधिक आक्रमक झाला आणि विशेषतः अंबुलडेनियाला लक्ष्य केले. पंतने या गोलंदाजाच्या एकाच षटकात सलग दोन षटकार आणि नंतर २ चौकारांसह एकूण २२ धावा जोडल्या. लवकरच तो त्याच्या शतकाच्या जवळ पोहोचला, पण त्यानंतर श्रीलंकेने नवा चेंडू घेतला आणि या नव्या चेंडूने सुरंगा लकमलने पंतचे स्टम्प उडवले (९६ धावा, ९७ चेंडू, ९ चौकार, ४ षटकार). आपल्या छोट्या कारकिर्दीत पंत पाचव्यांदा ९० ते १०० च्या दरम्यान बाद झाला. पंतच्या काउंटर अॅटॅकच्या जोरावर भारताने झटपट ३५० धावांचा टप्पा ओलांडला आणि दिवसाचा शेवट दमदार पद्धतीने झाला. पंतशिवाय रवींद्र जडेजाही चांगली खेळी करत ४५ धावांवर नाबाद राहिला. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विन (११) दुसऱ्या दिवशी भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याची आशा आहे.