मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईमधील जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार भाजपमधील वाद उफाळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे.
नव्याने मंत्री झालेले केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत. नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांना आम्ही स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. तर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार असल्याचा निर्धार राणेंनी केलाय. नारायण राणे यांचे सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन करतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. त्यानंतर जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. मुंबईच्या अनेक भागांतून राणेंची जनआशीर्वाद यात्रा जाणार आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे जनतेशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान महाविकास आघाडी सरकारवर काय हल्लाबोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा राहिली आहे. आता खुद्द राणे शिवसेनेच्या अंगणात येत आहेत. आज राणे शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २०० कोटींचा निधी
सिंधुदुर्गमध्ये मिनिट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मिनिट्रेनसाठी ट्रॅक तयार करण्याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालायला देण्यात आला आहे कणकवली ते नांदगाव, देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि पुन्हा कणकवली असा मिनीट्रेनसाठी ट्रॅक तयार करावा व मिनिट्रेन सुरू करावी त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दर्शन होणार आहे. मालवाहतूकही करता येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी खूप संकल्पना असून लोकांनी सहकार्य केल्यास त्या टप्पा टप्याने अंमलात आणणार आहे अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे जनआशीर्वाद यात्रेसाठी कोकणात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना विविध प्रक्रिया उद्योग व्यवसाय करता यावे यासाठी सिंधुदुर्गात २० एकर जागेत २०० कोटीचे उद्योग ट्रेंनिग सेंटर उभारण्यात येणार आहे. व ट्रेनिग घेतल्यानंतर उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्यही दिले जाणार आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सचित्र माहिती असणारी विशेष ट्रेन व सिंधुदुर्गमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव ही रेल्वे मत्र्यांना देण्यात आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.