मुंबई: विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. के. चंद्रशेखर राव आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीच नाही. सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव आणि इतरांनी मुंबईतील बैठक संपल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.
दरम्यान, केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. भाजपच्या विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थितीवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.