Top Newsराजकारण

मोदी सरकारमुळे हिंदूंचा सन्मान : अमित शाह

अहमदाबाद : हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अनेक वर्षांपासून अपमान करण्यात आला आणि २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईपर्यंत कोणीही नाही, त्यांचा सन्मान करण्याची तसदी घेतली नाही. मोदी सरकार आता अशा स्थळांच्या नूतनीकरणासाठी ‘निर्भयपणे’ काम करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, पूर्वी लोक मंदिरात जाण्यास टाळाटाळ करत होते, परंतु मोदी सरकारमुळे एक नवीन युग सुरू झाले आहे.

अहमदाबादमधील कडवा पाटीदार समाजाची देवी ‘माँ उमिया’ समर्पित उमियाधाम मंदिराच्या पायाभरणी समारंभात अमित शाह बोलत होते. जवळपास १५०० कोटी रुपयांचा खर्च करून हे मंदिर आणि इतर इमारती बांधल्या जात आहेत. या कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले, अनेक वर्षांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अपमान करण्यात आला आणि केंद्रात मोदी सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईपर्यंत कोणीही त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

याचबरोबर अमित शाह म्हणाले, आज आर्य समाजी (गुजरातचे राज्यपाल) आचार्य देवव्रत यांच्या हस्ते एका भव्य मंदिराची पायाभरणी होत असताना, अशा प्रसंगी मी सांगू इच्छितो की मोदीजींनी आपल्या केंद्रांच्या जीर्णोद्धारासाठी विश्वास, निर्भयपणे, आत्मविश्वासाने आणि आदराने काम केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आणि २०१३ च्या महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ मंदिर परिसरात कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा केंद्राचे पुनरुज्जीवन केले.

औरंगजेबाच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आपण १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होताना पाहू. मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रेच नाहीत, तर ती समाजसेवेची आणि जीवनातून निराश झालेल्या लोकांसाठी त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारी केंद्रे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, पाटीदार समाजाचे कौतुक करत गुजरात आणि देशाच्या उन्नतीचा इतिहास या समाजाशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसीय पायाभरणी समारंभाच्या पहिल्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतरांनी कार्यक्रमात भाग घेतला. तसेच, १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल माध्यमातून पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button