मुक्तपीठ

विकास गेला चुलीत, भाजपला सत्तेसाठी धर्म तारणहार !

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताला संबोधित करताना लोकशाही पुढच्या काळात ज्यांना मजबूत आणि अधिक समृद्ध करायची आहे ते महत्त्वाचे दोन घटक हिंदू आणि मुस्लिम असल्याचा उल्लेख केला होता, तोवर धर्माच्या नावावर हे दोन बलाढ्य समूह एकमेकांवर कसे तुटून पडले होते, रक्त मांसाचा कसा चिखल पसरला होता याचे ते साक्षीदार होते. स्वतंत्र भारतात या प्रसंगांची कधीही पुनरावृत्ती होऊ देऊ नका असे आवाहन करताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. आपल्या देशात राजकीय महत्त्वाकांक्षा एवढ्या राक्षसी बनल्या की त्यासाठी रक्तपात हा आपल्या देशाचा स्थायीभाव बनला आहे.

भारतात धार्मिक दंगली आता सुरू झाल्या नाहीत, आता भाजप सत्तेवर आहे म्हणून दंगली होतात असेही नाही. तो आधी विरोधात होता तेव्हा सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सत्तेवर असला की हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी दंगली घडवून आणतो, हे आधीच्या अनेक घटनांत सिद्ध झाले आहे. परंतु पक्ष म्हणून भाजपने कधीच ते मान्य केले नाही ही त्यांची खासियत आहे. कोणत्याही घटनेत भाजप नेता किंवा पदाधिकारी आढळला की भाजप त्या त्या व्यक्तींवर जबाबदारी ढकलत आजवर नामानिराळे राहत आलेला पक्ष आहे. अमरावती शहरात रजा अकादमी वाल्यांनी आगाऊपणा करीत शहर बंद करण्याची जबरदस्ती केली त्यातून वाद आणि तोडफोड झाली त्याचे पर्यवसान दंगलीत झाले याला दोन्ही बाजू आहेत.

कुठेतरी त्रिपुरा राज्यात मुस्लिम समूहांवर हल्ले झाले आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला रजा अकादमी पुढे आली. या उपटसुंभ रजा अकादमीला एवढेच काम उरले आहे का ? जगात,देशात कुठेही मुस्लिम समूहांवर काही झाले की रजा अकादमी रस्त्यावर उतरते,मुंबई, भिवंडी, मालेगाव या ठिकाणी यापूर्वी रजा अकादमीचा उपद्रव सगळ्यानी बघितला आहे. रजा अकादमीला इथल्या मुस्लिम समूहाचे रोजचे प्रश्न दिसत नाहीत का? आजही ७० टक्के मुस्लिम झोपड्या आणि गलिच्छ वस्तीत राहतो. शिक्षण, नोकरीत त्यांचा टक्का कमालीचा घसरला आहे. मुस्लिम उद्योजक तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. वाढती संख्या आहे पण तुलनेत आरोग्य सुविधा मिळत नाहीत हे रजा अकादमी बघत नाही का ?

अडाणी समूह त्यातील ठराविक शहाण्या व्यक्तींचे नेहमी खाद्य बनत असतो,मुस्लिम समुदाय आपल्या देशात गेली ७५ वर्ष हे सहन करीत आहे ते सुधारावे असे रजा अकादमीला का वाटत नसावे? यावर मुस्लिम तरुणांनी मेंदूला जोर देण्याची गरज आहे. मुस्लिम समूहाचे अडाणीपण जसे त्यांच्या पुढाऱ्यांचे खाद्य बनले आहे तसेच ते हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या इतर शक्तींचे पण बनले आहे. आधीच कट्टर त्यात धर्माचा नारा बुलंद झाला की देशाचे, समाजाचे थेट दोन भागात विभाजन होते, हिंदुमधील बहुजन समाजाला हे नको आहे, मात्र कोणत्याही कारणाने मुस्लिम एकवटला की अठरा पगड जाती इच्छा नसताना हिंदू नावावर एकत्र येतात आणि त्यांच्या मेंदूमधील विवेक कप्पा बंद होतो हेच भाजपला हवे असते.

आता तोंडावर पालिका, महापालिका निवडणुका आहेत. बहुतांश पालिकात भाजप सत्तेवर आहे. पाच वर्षे खुर्च्या उबवून त्यांनी गडगंज माया गोळा करताना लोकांची कामे करायची असतात याचा विसर पडला आहे. आता लोकांपुढे कोणता मुद्दा घेऊन जावा हे संकट त्यांना पडले असतांना रजा अकादमी संकटमोचक म्हणून मदतीला आली आहे. हिंदू समूह आणि धर्म वाचला तर राजकारण वाचेल आणि त्यासाठी आम्हीच कसे हिंदू तारणहार आहोत हे दाखवण्याची भाजपमध्ये स्पर्धा लागली आहे. विकास जाऊ द्या चुलीत, धर्म तारणहार म्हणून आम्हालाच मतदान करा हे म्हणण्याची संधी काही मुस्लिम पुढाऱ्यांच्या मूर्खपणामुळे भाजपला मिळत आहे हे लक्ष्यात आले की दंगली थांबतात, पण लक्ष्यात यायला हवे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button