लस घेतल्यानंतरही रश्मी ठाकरेंना कोरोना
मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर आता त्यांच्या आई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 20 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांचासुद्धा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढलीय.
राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जनतेला काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे कोरोना काळात स्वत: मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व शहरांचा आढावा घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना सूचना द्यायचे. मात्र, तरीही दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालाय.
आदित्य ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक लोकांना भेट दिली. अनेक विकास कामांचे उद्घाटन त्यांनी केले. याशिवाय सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र, हे सर्व काम करत असताना ते कदाचित कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले असावेत त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.