भारतात लवकरच सुरु होणार झुनझुनवालांची अकासा विमान कंपनी

नवी दिल्ली : शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे लवकरच एका नवीन विमान कंपनीसाठी ७० विमाने खरेदी करण्याची योजना आखत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, राकेश झुनझुनवाला यांची पुढील चार वर्षांत ७० विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करण्याची इच्छा आहे. दरम्यान, भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा, असे शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांना वाटते.
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला म्हणाले की, नवीन विमान कंपनीत जवळपास ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून विमान कंपनीत ४० टक्के हिस्सा घेण्याची योजना आहे. येत्या १५-२० दिवसांत भारतीय उड्डाण मंत्रालयाकडून एनओसी मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
झुनझुनवाला यांची भारतात लो कॉस्ट बजेट विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. ज्याचे नाव अकासा एअर आणि द टीम असेल. या नवीन विमान कंपनीत डेल्टा एअरलाईन्सच्या माजी वरिष्ठ कार्यकारीप्रमाणे संपूर्ण टीम असणार आहे. ही टीम अशी विमाने पहात आहे, ज्यात एकावेळी १८० लोक प्रवास करू शकतात.
भारतात वॉरेन बफे म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी ही मोठी पैज असल्याचे सांगितले जात आहे. कारण गेल्या काही काळात वाढत्या स्पर्धेमुळे भारतातील अनेक विमान कंपन्या बंद पडल्या आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे एव्हिएशन मार्केट मानले जाते, त्यामुळे राकेश झुनझुनवाला एव्हिएशन सेक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेऊ इच्छित आहेत.