हेमंत टकलेंसाठी राजू शेट्टींचा पत्ता कापणार; अजित पवारांचे संकेत
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत बदल होण्याची शक्यता
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. त्यातच आता १२ पैकी काही जणांचा पत्ता कापण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निष्ठावंत नेत्याला अर्थात हेमंत टाकले यांना आमदारकी मिळू शकते.
माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव १२ जणांच्या यादीत आहे. शेट्टी यांच्या आमदारकीबद्दल कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका नियमाचा संदर्भ देत सूचक विधान केलं. ‘निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे शेट्टींचा पत्ता कापला जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
राजू शेट्टींच्या जागी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते. हेमंत टकले शरद पवारांचे अतिशय विश्वासू आहेत. पवारांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० अशी १२ वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष असलेले टकले यांचं विविध संस्थांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आहे. कला, साहित्य क्षेत्राचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचे शरद पवार यांनी मान्य केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे आता राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे राजू शेट्टी म्हणाले.