
नवी दिल्ली: माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.
हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असं विधान केलं जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.




