Top Newsराजकारण

गोवा निवडणूक : फडणवीसांची शिष्टाई अपयशी; उत्पल पर्रिकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यातच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी सर्व पर्यायांना बाजूला ठेवून पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस नेते उदय मडकईकरही उत्पल यांच्यासोबत होते.

उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकडो समर्थकांनी उपस्थिती लावत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. उत्पल पर्रिकर यांच्यासह भाजपवर नाराज होऊन सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय विद्यामान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपकडून साखळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर होते.

उत्पल यांना वाढता पाठिंबा

भाजपने दिलेले सर्व पर्याय नाकारल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी उत्पल यांनी पणजीतील अन्य पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. पैकी काँग्रेसचे नेते उदय मडकईकर यांनी उत्पल यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांच्यासह निवडणुकीचा प्रचारही करणार असल्याचे स्पष्ट केले. उत्पल यांनी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचेही आशीर्वाद घेतले आहेत. उत्पलची उघड बंडखोरी तसेच वेगवेगळ्या घटकांकडून त्यांना मिळणारा वाढत पाठिंबा पाहता बाबूश यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते व प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनीही पक्षाला रामराम केला असून, उत्पल यांना समर्थन दिले आहे. स्वच्छ राजकारण व्हावे व गोव्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असलेल्या उत्पल पर्रीकर यांना माझा पाठिंबा आहे. उत्पलसाठी पूर्णपणे काम करता यावे, यासाठी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे, असे सांगत नाईक यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे

दबावाला भीक घालणार नाही; पार्सेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

मांद्रेत भाजपने तिकीट नाकारल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मी कोणाच्याही दबावाला भीक घालणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, पार्सेकर यांचे मन वळविण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्याकडे आमची बोलणीही चालू आहेत. यावर उत्तर देताना पार्सेकर म्हणाले की, मला आता मुख्यमंत्री किंवा मंत्री बनायचे नाहीये. त्यामुळे पुन्हा भाजपत जाण्याचा प्रश्नच नाही. पक्षासाठी आजपावेतो भरपूर काही केले. आता जनतेसाठी करीन. माझ्याशी बोलणी चालू आहेत, असे म्हणणाऱ्यांना ताठ मानेने माझ्याकडे यावे आणि बोलावे. मी अशा दबावांना मुळीच भीक घालणार नाही, असंही त्यांनी यावेळी सुनावलं.

मांद्रे मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मन वळवण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालूच ठेवले असल्याची माहिती समोर आली होती. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती देताना सांगितले की, पार्सेकर यांच्याशी आमची बोलणी अजून चालूच आहेत. त्यांनी निर्णय बदलावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि यात आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.

राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : फडणवीस

राज्यातील भाजप सरकारने डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाआखाली अतिशय प्रभावी कामगिरी केलेली आहे. आगामी निवडणुकीत राज्यात २२ अधिकसह भाजपचे सरकार सत्तेत येईल. डॉ सावंत मुख्यमंत्री, तर राजेश पाटणेकर मंत्री बनतील, असा दावा भाजप गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला. डॉ प्रमोद सावंत तसेंच सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी फडणवीस उपस्थित होते.

केंद्र व राज्य मिळून डबल इंजिन सरकारने प्रत्येक घरात समृद्दीचा नारा देताना अनेक योजना घरात पोचवल्या. अनेक कल्याणकारी योजनांना चालना दिली, राज्याचा चौफेर विकास साधला. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा भाजपच आहे. आमचे २२ हून अधिक आमदार निवडून येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या हस्ते भाजप प्रचार कार्यालय याचे उदघाटन करण्यात आले

राज्यातील जनतेने भाजपला साथ द्यायचे निश्चित केलेले आहे अनेक क्षेत्रात आम्ही विकास साधला त्यामुळे डबल इंजिन सरकारच विकासाला चालना देऊ शकते यांची जनतेला खात्री पटलेली आहे, असे डॉ सावंत म्हणाले. राजेश पाटणेकर यांनी जनता भाजपला पुन्हा संधी देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button