दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीने ठरवावे; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
कोल्हापूर: गेल्या काही महिन्यांपासून विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे म्हटले आहे.
राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचे शरद पवार यांनी मान्य केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. स्वाभिमानीने राष्ट्रवादीला त्या समझोत्याची आठवण करून दिली, असे राजू शेट्टी म्हणाले.
जून २०१९ मध्ये बारामतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित जागांसाठी पाठवलेल्या नावांमध्ये माझे नाव समाविष्ट केले होते. तेव्हापासून गेल्या सव्वा वर्षात या विषयावर कुणाशीही चर्चा झालेली नाही. कुणालाही भेटलेलो नाही. फोन केलेला नाही. माझ्या नावाबाबत आता जी चर्चा सुरू आहे, त्यात आम्हाला अजिबात रस नाही. तो आमच्यासाठी काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवायचे आहे. स्वाभिमानीचा तो अधिकार आहे. माझे निर्णयाकडे लक्ष आहे, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यपालांच्या भूमिकेबाबत विचारले असता, राज्यपालांना निर्णय घेण्याची सवय नाही. त्यांना आधी निर्णय घेऊ द्या. मग आमदारकी स्वीकारायची की नाही हे ठरवेन, असे राजू शेट्टी म्हणाले.