नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासह, परीक्षा रद्दचे प्रकरण, एमआयएम पक्षाने काढलेली तिरंगा रॅली, रजा अकादमी दंगल, ओबीसी आरक्षण, सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेला मृत्यू, राहुल गांधींचे विधान यांसारख्या अनेकविध विषयांवर यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे.
भारतीय जनता पक्षासमोर असलेलं महाविकास आघाडीचं आव्हान, शिवसेनेनं साथ सोडल्यापासून एकाकी पडलेला भाजप आणि राज ठाकरेंनी हाती घेतलेला प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा यावरून भाजप-मनसेच्या युतीचा विषय अनेकदा चर्चेत येतो. पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष याबद्दल चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. भाजप-मनसे युती होणार का, असा प्रश्न राज यांना विचारला गेला. त्यावर राज यांनी ‘मला माहीत नाही’, असं उत्तर दिलं. ‘युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्या चर्चांबद्दल मला माहीत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी संपावर अधिकृतपणे बोलायला हवे. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही, असं मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडलं.
राज ठाकरेंनी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबतही मत व्यक्त केलं आहे. बिपीन रावत यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच हा अपघात होता की घातपात होता यावर संशय घेतला जात आहे. मात्र, हा घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का? असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच या देशात अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे मिळतच नाही, हेच मी वारंवार सांगतोय, असंही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, परीक्षा रद्द होणे तसेच परीक्षांच्या गोंधळाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोक मनावर घेत नाहीत. निवडणुकांमध्ये या सर्व गोष्टी विसरून जातात. तसेच परीक्षेचा घोळ करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. ज्या त्रासातून आपण गेलो, त्याची आठवण निवडणुकांमध्येही ठेवलायला हवी. केवळ सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
कोरोना नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच समजत नाही
कोरोना नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच नीट समजत नाही. कोरोना नियमांमध्ये एकाला सूट आणि दुसऱ्याला नाही, असे सुरू आहे. थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची. मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला. १९९५ मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली. तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहिती नव्हते. त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला. तेव्हा त्याला बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले, असे सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय आला कसा?
अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय आला कसा, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. कोण कोर्टात गेलं, का गेलं, हे समजून घ्यायला हवं. जातीपातीतून बाहेर येत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. मुख्य प्रश्न बाजूला राहतात. अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली अजून तरी कळलं का. गाडी ठेवणाऱ्याचा हेतू कळाला नाही. मात्र, देशमुख तुरुंगात आहेत, असे ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, ५ लाख लोकांनी भारत सोडला. हे लक्षण चांगले नाही. मात्र, हा सगळा नोटाबंदी आणि कोविडचा फटका आहे. अनेक व्यावसायिक हे देश सोडून जातायत. हे देशासाठी चांगले नाही. याचा लाखो नोकऱ्यांवर परिणाम होतो आहे आणि आपण आर्यन आणि सुशांतवर वेळ वाया घालतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधींच्या ‘मी हिंदू’ वक्तव्याची खिल्ली
मी आत्ता राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं, मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणतात. मग, आत्ता काय आफ्रिकन लोकं राहतात का येथे, कोण करतंय राज्य? असा मिश्कील सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून ‘सत्ता’ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिंदुत्ववादी भीतीत जगत असतात, असे राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या हिंदुत्त्वावादी विधानावरुन राज ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
शरद पवारांच्या जिद्दीला सलाम
राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या वैयक्तीक नात्याची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळेच, राज ठाकरे शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळताना कधीही हात आखडता घेत नाहीत. यापूर्वीही अनेकदा त्यांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं आहे. आता, शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राज यांनी त्यांची मुक्तकंठपणे प्रशंसा केली. शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला, आपण कशारितीने शुभेच्छा दिल्या, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी बुके पाठवला… ८१ वर्षं त्यांची पूर्ण झाली आहेत. आपण ८१ व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन साजरं करतो… राजकारणात महाराष्ट्र गेली ६० वर्ष शरदचंद्रदर्शन करतोय, ६० वर्षे सातत्य ठेवणं ही साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मी काल फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक केलं. राजकारणात मतभेद वेगळे असतात, पण त्यांच्या राजकीय वाटचालीचं घडामोडीचं मी लहान आहे म्हणून कौतुक हा शब्द न वापरता, प्रशंसा म्हणता येईल, असे म्हणत कौतुक केले.
ज्या प्रकारे या वयात, काही व्याधी वगैरे घेऊन ज्या प्रकारे फिरताहेत, काम करताहेत ही विलक्षण गोष्ट… राजकीय मतभेद असणं हा एक भाग झाला, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत… चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा महाराष्ट्र आहे. मी वयाने बराच लहान आहे, पण जेवढी त्या गुणांची प्रशंसा करावी तेवढी कमीच असल्याचं राज यांनी म्हटलं.