
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांनीही कोरोना चाचणी केली असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रियंका गांधी यांनी सांगितलं की, रॉबर्ट वड्रा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केला आहे. मी आता आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे मी माझा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द केला आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी पुढील काही दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार आहे. असुविधेसाठी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते.