राजकारण

राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण…? : चंद्रकांत पाटील

नाशिक : सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आता खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही ते म्हणाले.

शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्यानासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात भाष्य करताना पाटील म्हणाले, ईडी ही एक केंद्रीय स्वायत्त संस्था आहे. यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नाही.

योग्यवेळी योग्य निर्णय : फडणवीस

चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सूचक विधान केलं आहे. फडणवीस दिल्लीहून नागपूरला दाखल होताच माध्यमांनी विमानतळावर त्यांना मनसेबद्दलच्या युतीबद्दल प्रश्न विचारला. त्याला फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button