मुंबई – जोरदार बरसात मुंबईत दमदार एन्ट्री घेणाऱ्या पावसाने पवई तलाव शनिवारी दुपारीच भरून वाहू लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधीच हा तलाव भरला आहे. मात्र ५४५ कोटी लिटर जलसाठा असलेल्या या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या पाण्याचा पुरवठा औद्योगिक वापरासाठी केला जातो.
मुंबईतील या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. गेल्या वर्षी हा तलाव ५ जुलै रोजी भरून वाहिला होता. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवई तलाव शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास भरून वाहू लागला. हे पाणी पिण्यासाठी वापरता नसले तरी पवई तलाव भरून वाहिल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
मुंबईत ढगाळ वातावरण कायम
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आली असून पुढील दीड महिना मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.