Top Newsआरोग्य

ओमायक्रॉनचे कर्नाटकात दोन रुग्ण; एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह

बंगळुरू/नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ६६ वर्षीय आणि ४६ वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.

दरम्यान, बंगळुरु महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात आलेल्या दोन परदेशी व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यापैकी ४६ वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते. या पाचही जणांची २२ आणि २५ नोव्हेंबरला कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, ४६ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झालेली असल्याचे आज समजले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाचही जणांची पुन्हा चाचणी करण्यात आली आहे. बंगळुरु पालिकेने ते कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना आयसोलेट केल्याचे म्हटले आहे.

या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्याच्या पुराव्यांचा अभ्यास केला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात ३७ लॅब आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले. जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्यात आली आहेत. त्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे., असे अग्रवाल यांनी म्हटले. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉन सापडला आहे.

पाच जण पॉझिटिव्ह

यापैकी ४६ वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवालाची वाट पाहत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन्ही रुग्ण हे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले म्हणजेच पूर्ण व्हॅक्सिनेटेड होते. तसेच ते आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात आले होते.

ओमायक्रॉनने संक्रमित ६६ वर्षीय रुग्ण हा भारतात सापडलेला पहिला रुग्ण आहे. तो पहिल्यांदा भारतात आला होता. कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह सापडला होता. यामुळे त्याच्यावर बंगळुरुमध्येच उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर तो पुन्हा मायदेशी परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतू दुसऱ्या रुग्णाने टेन्शन वाढविले आहे. त्याच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेने जगाला केले सावध

कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने २६ नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते. परंतू तेव्हा हा व्हेरिअंट सुप्तावस्थेत होता. जगभरात खळबळ उडाल्यानंतर या व्हेरिअंटची लागण झालीय का याची जिनोम सिक्वेंसिंगद्वारे तपासणी करण्यात आली तेव्हा या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले.

४० देशांमधून २८६८ प्रवासी मुंबईत; नऊ कोरोनाबाधित

ओमायक्रॉन संक्रमित दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून आतापर्यंत २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये आठ प्रवासी कोरोना बाधित तर एकजण संपर्कात आल्याने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने मुंबई महापालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारची दहशत वाढली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात मुंबईत संबंधित देशातून आलेल्या प्रवाशांचा शोध पालिकेच्या माध्यमातून घेतला जात आहे. यामध्ये ओमायक्रॉन संक्रमित ४० देशांमधून आलेल्या प्रवाशांची यादी तयार करून त्यांच्या तातडीने कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.

या चाचणीत कोरोना बाधित आढळलेल्या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. तसेच नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जिन’ चाचणीही केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम

कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाले आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. यात कोरोना लसीकरण आणि उच्च जोखीम असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्टसंदर्भात कडक अंबलबजावणी करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे वेळोवेळी लादलेले निर्बंध सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवाशांना लागू करण्यात येतील. तसेच, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिंबाब्वे या देशांना उच्च जोखमीचे देश म्हणून वर्गीकृत केले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र जे आंतराष्ट्रीय प्रवासी उच्च जोखीम असलेल्या देशांमधून येत आहेत आणि महाराष्ट्रात येण्यापूर्वी गेल्या 15 दिवसांत कोणत्याही उच्च जोखमीच्या देशांना भेट दिली आहे, असे प्रवासी उच्च जोखीम प्रवाशांच्या श्रेणीतील म्हणून जाहीर केले जातील. उच्च-जोखीम असलेल्या प्रवाशांना विमानतळावर प्राधान्याने उतरवले जाऊ शकते. त्यांच्या तपासणी आणि पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर संबंधित विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल.

अशा सर्व उच्च जोखीम असलेल्या विमान प्रवाशांना संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतळावर लगेच आरटीपीसीआर टेस्ट द्यावी लागेल. तसेच, प्रवाशांना सात दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल आणि सातव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. जर आरटीपीसीआर टेस्टमध्ये प्रवासी पॉझिटीव्ह आढल्यास, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल आणि कोरोनावरील उपचारांची सुविधा दिली जाईल.

याचबरोबर, सातव्या दिवशी दुसरी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर या प्रवाशांना पुढील 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले जाईल. याशिवाय. देशांतर्गत विमान प्रवासाच्या बाबतीत, प्रवाशांना एकतर पूर्णपणे लसीकरण करावे लागेल किंवा प्रवास करण्यापूर्वी 72 तासांच्या आत आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्यपणे सोबत ठेवावा लागणार आहे.

ओमायक्रॉनचा तरुणांना जास्त धोका; तज्ज्ञांचा इशारा

या नवीन व्हेरिएंटबाबत दक्षिण आफ्रिकेचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉन किती प्राणघातक आहे आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होईल? हे तूर्तास सांगणे कठीण आहे. पण, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटतचा आतापर्यंत बहुतांश तरुणांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ओमायक्रोनमुळे फक्त सौम्य आजार येईल, असे म्हणणे थोडे घाईचे ठरू शकते. याबाबत अधिक माहिती गोळा करत आहोत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दोन ते तीन आठवड्यांनंतरच याबद्दल अधिक माहिती मिळेल. काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ते सर्व तरुण आहेत, ज्यांचे वय ४० किंवा त्यापेक्षा कमी आहे, असेही दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांनी सांगितले.

दुसरीकडे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसमधील (एनआयसीडी) सार्वजनिक आरोग्य देखरेख आणि प्रतिसाद प्रमुख मिशेल ग्रोम यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जास्तकरून तरूणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आम्ही वृद्ध वयोगटांमध्येही याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसने सांगितले होते की, दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हेरिएंटची संख्या गेल्या २४ तासांत जवळपास दुप्पट होऊन ८,५६१ झाली आहे. ओमायक्रॉन हा आतापर्यंत देशातील मुख्य स्ट्रेन आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि तज्ज्ञांनी २५ नोव्हेंबरला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याचे जाहीर केले. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटचे ओमायक्रान असे ठेवले. हा नवीन व्हेरिएंट आढळल्यानंतर,अमेरिका, युरोपियन संघ, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांनी अनेक दक्षिण आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. तसेच, काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button