कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील निवडणूक प्रचार सभा रद्द; राहुल गांधींचा मोठा निर्णय
सर्वपक्षीय नेत्यांनाही आवाहन; भाजप-तृणमूलची कोंडी
नवी दिल्ली: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.
देशभरात कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहेत. देशातील अनेक राज्यात तर रुग्णांना बेड्सही मिळत नाहीत. तसेच अनेक राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलींमुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा विस्फोट होऊ नये म्हणून राहुल यांनी रॅली न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप आणि टीएमसीची मोठी कोंडी झाली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तर ममता बॅनर्जी या राज्याच्या प्रमुख आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हे दोन जबाबदार नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात 24 तासात 261500 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 1501 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. अशा प्रकारे मरणाऱ्यांची आणि रुग्णांची संख्या पहिल्यांदाच पाहिली आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.