नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातही महागाई, इंधन दरवाढ, पॅगेसस हेरगिरी, केंद्रीय कृषी कायदे, शेतकरी आंदोलन प्रकरणी विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात टीकास्त्र सोडले जात असून, गोंधळामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले आहे. आताच्या घडीला केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधक संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करावी. संसदेचा आणखी वेळ फुकट घालवू नये, या शब्दांत टीका केली आहे.
संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
हमारे लोकतंत्र की बुनियाद है कि सांसद जनता की आवाज़ बनकर राष्ट्रीय महत्व के मुद्दों पर चर्चा करें।
मोदी सरकार विपक्ष को ये काम नहीं करने दे रही।
संसद का और समय व्यर्थ मत करो- करने दो महंगाई, किसान और #Pegasus की बात!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 29, 2021
खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. याआधी पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल? त्यांच्याकडून तर काँग्रेस पक्षही सांभाळला जात नाही, असा टोलाही पात्रा यांनी लगावला. राहुल गांधी यांनी एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातातून ज्या प्रकारे कागदपत्रे फाडली होती, तसेच काहीसे त्यांच्या सहकाऱ्यांनी संसदेत केले, असा चिमटाही संबित पात्रा यांनी काढला.