Top Newsराजकारण

भारतीय मुलाचे अपहरण आणि पेंगाँग त्सो सरोवरावरील अनधिकृत बांधकामावरून राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १७ वर्षीय किशोरवयीन मुलाचे अपहरण केल्याची माहिती मीडियातून समोर आली आहे. त्या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांनी या घटनेवरील पंतप्रधान मोदींच्या मौनावर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट केले की, प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी, भारताच्या भविष्य निर्मात्याचे चीनने अपहरण केले आहे. आम्ही मीराम तरौनच्या कुटुंबासोबत आहोत आणि आशा सोडणार नाही, हार मानणार नाही. पंतप्रधानांचे मौन दर्शवते की, त्यांना पर्वा नाही!, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

अरुणाचलच्या खासदाराने केली पुष्टी

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी ही घटना १८ जानेवारीला घडल्याची पुष्टी केली आहे. अरुणाचल प्रदेश सरकारच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती नवी दिल्लीला देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी बुधवारी एका १७ वर्षीय तरुणाचे भारतीय हद्दीतून अपहरण केल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. गाओ यांनी सांगितल्यानुसार, अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मीरम तरौन असे आहे.

मोदी चीनच्या पुलाचंही उदघाटन करतील याचीच भीती !

राहुल गांधी यांनी चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषेच्याजवळ लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवरावर अनधिकृतरित्या पुलाचं बांधकाम केलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. चीनकडून केल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी याआधी उपस्थित केला होता. आता राहुल गांधी यांनी चीनच्या अनधिकृत कारनाम्याचा फोटोच जारी करत केंद्र सरकार आणि विशेषत: मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून लडाखमध्ये पेंगाँग सरोवरावर चीनकडून पूल बांधला जात असल्याचा एक फोटो ट्विट केला आहे. चीनच्या कारनाम्यांवर मोदींनी साधलेल्या मौनव्रतामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीला अतिक्रमण करण्यासाठीचं प्रोत्साहनच मिळत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच आता आपले पंतप्रधान कदाचित चीनच्या या पुलाचंही उदघाटन करतील की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे, असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे.

चीनकडून पेंगाँग सरोवरावर एका पुलाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचं ४०० मीटरहून अधिक बांधकाम पूर्ण देखील झालं आहे. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर चीनला संबंधित परिसरात प्राबल्य वाढवता येईल असं सांगितलं जात आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील एक महत्त्वपूर्ण बिंदू ठरणारं हे ठिकाण असल्याचं देखील म्हटलं जात आहे. चीन बांधत असलेला पूल ८ मीटर रुंद असून पेंगाँगच्या उत्तर तटावर असलेल्या चीनी सैन्याच्या फिल्ड बेसपासून दक्षिणेकडे याचं निर्माण कार्य सुरू आहे. याची ठिकाणी २०२० साली भारत आणि चीनमध्ये होणारी बाचाबाची व तणाव लक्षात घेता सैनिकांना राहण्यासाठी तात्पुरते तंबू बांधण्यात आले होते. तसंच प्राथमिक उपचार केंद्र देखील उभारण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button