मराठा आरक्षण मोर्चा पुढे ढकला; विखे-पाटील संभाजीराजेंना भेटणार
नाशिक: येत्या दोन दिवसात संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा करून सर्व मराठा संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संभाजीराजेंनी १६ तारखेचे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंतीही त्यांना भेटून करणार असल्याचे भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे सर्व मराठा समाजातील आमदार, खासदार तसेच नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे आवाहन केलं. येत्या दोन दिवसात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि नेत्यांना एकत्रित बोलावण्यात येणार आहे. नेते आणि सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी या सर्वांना एकत्र आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाचं आंदोलन कुणी एकट्याने करू नये. या आंदोलनाला सामूहिक नेतृत्व असावं, असं मत विखे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर, संभाजीराजेंच्या समर्थकांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन १६ जूनच्या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे.