फोकसराजकारण

वानखेडेंना पुन्हा धक्का! कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आणखी एका साक्षीदाराचा दावा

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळच वळण प्राप्त झालं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. प्रभाकर साईलनंतर आता आणखी एक साक्षीदार समोर आला आहे आणि त्यानं वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी माझ्याकडूनही कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असा गौप्यस्फोट शेखर कांबळे नावाच्या साक्षीदारानं केला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं समोर येऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले. दरम्यान, शेखर कांबळेनं केलेले आरोप क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाशी संबंधित नाहीत. नवी मुंबईतील खारघर येथे एका नायजेरियन व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील कारवाईवेळी शेखर कांबळे याच्याकडून पंचनामा म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या असा आरोप करण्यात आला आहे. माझ्याकडून त्यावेळी १० ते १२ कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा पंचनामा म्हणून वापर करण्यात आला होता, असा आरोप शेखर कांबळे यानं केला आहे.

शेखर कांबळे सारखंच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी निगडीत ड्रग्ज कारवाईत प्रभाकर सैल नावाच्या साक्षीदारानंही एनसीबीनं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे, तर आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींचं डील सुरू होतं असा आरोपही प्रभाकर साईल यांनी केला आहे. याप्रकरणाच्या चौकशीलाही आता सुरुवात झाली आहे. प्रभाकर साईलच्या आरोपांमुळे समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता आणखी एका प्रकरणात अशाच पद्धतीचा आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे.

मी काल टेलिव्हिजनवर बातमी पाहिली. ज्यात खारघरच्या केसचाही उल्लेख केला गेला. त्यानंतर मी घाबरलो. मला अनिल माने नावाच्या एका एनसीबी अधिकाऱ्याचा फोन आला. आशिष रंजन नावाचे अधिकारी संपूर्ण प्रकरण हाताळत होते, असं शेखर कांबळे यानं सांगितलं आहे. अनिल माने यांनी रात्री उशिरा माझ्याशी फोनवरुन संपर्क केला आणि घडलेल्या प्रसंगाची कुणालाही माहिती न देण्यास सांगितलं, असा दावा शेखर कांबळे यांनी केला आहे. शेखर कांबळे यांनी यावेळी समीर वानखेडे यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे.

समीर वानखेडे यांनी माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या आणि घाबरु नकोस काहीच होणार नाही असं मला म्हटलं होतं, असं शेखर कांबळे म्हणाला. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड देखील शेखर कांबळे यानं सादर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button