लखनऊ : उत्तराखंडमधील हरिद्वाररमध्ये भरलेल्या धर्मसंसदेत काही धर्मगुरूंनी चिथावणीखोर भाषणे केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी हरिद्वार पोलिसांनी यती नरसिंहानंद गिरी यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यती नरसिंहानंद गिरी यांच्या आधी वसीम रिजवी उर्फ जितेंद्र त्यागी यांना पोलिसांनी अटक केली होती. यती नरसिंहानंद गिरी हे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील डासना मंदिरातील पुजारी आहेत. यााधीसुद्धा गिरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर यती नरसिंहानंदने पोलीस अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या होत्या. तुम्ही सर्व मरणार आहात असे वक्तव्य यती नरसिंहानंद यांनी केले होते. धर्म संसदेत केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी कारवाई करण्यासाठी उत्तराखंड सरकारवर दबाव होता. या संपूर्ण प्रकरणावरून भाजप सरकारवरही टीका होत होती. राज्य सरकारसोबतच विरोधकांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता.
हरिद्वारमध्ये भरलेल्या ‘धर्म संसद’मध्ये अनेक वक्त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे केली होती. या भडकाऊ भाषणाचे अनेत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच सोशल मीडियावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर हरिद्वार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही कोणावरही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी हाच युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात ठेवत याचिका दाखल केली होती. ज्यावर सर्वोच्च न्यायालयानेही सुनावणी घेण्याचे मान्य केले. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी यांच्यासह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबरपर्यंत धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होते. या धर्म संसदेत साधू-संतांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते. या धर्म संसदेतील वक्त्यांनी कथितरित्या मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन केलं आणि ‘हिंदू राष्ट्रा’साठी संघर्ष पुकारण्याचं आवाहन केले होते. याप्रकरणी माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनी या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी या प्रकरणी आयोजक आणि वक्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.