ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच; पुणे पोलिसांचा दुजोरा

पुणे : माजी मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा कॅबिनेटच्या दारापर्यंत आले होते, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची चर्चा होती. मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे. एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे राठोडांच्या मंत्रिपदाचं स्वप्न तर दूरच, उलट त्यांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाला, किंवा तिनं आत्महत्या केली, की मग थेट तिचा खून झाला, यावर भाजप आधीपासून प्रश्न उभं करत आलं आहे. एकीकडे तरुणीच्या नातलगांकडून कोणतीही तक्रार झाली नाही. मात्र जर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आवाज संजय राठोड यांचाच असल्याचं सिद्ध झालं असेल, तर पोलीस कारवाईसाठी मुहूर्त का शोधत आहेत, असा प्रश्न आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा संजय राऊतांपासून सर्वच शिवसेना नेते चौकशीअंती बोलणं योग्य असल्याचं म्हणत होते. आता त्याच चौकशीतला एक टप्पा पूर्ण होऊनही शिवसेना नेते सावधच भूमिका घेत आहेत.
उशिरानं घेतलेल्या राजीनाम्यानं याआधीच उद्धव ठाकरेंच्या संयमी, सोज्वळ प्रतिमेला धक्का पोहोचला होता. आता फॉरेन्सिक रिपोर्टनंतर पुन्हा तीच दिरंगाई शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.




