Top Newsराजकारण

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा निषेध; भाजपचा काँग्रेसच्या मुंबई कार्यालयावर मोर्चा

मुंबई : पंजाबमध्ये घडलेल्या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीचा निषेध करण्यासाठी आज भाजपचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या दादरमधील कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते. यावेळी पोलिसांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

पंजाबमध्ये काल, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील फिरोजपूरमध्ये भाजपची मोठी रॅली होणार होती. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्यासाठी गेले होते. परंतु संतप्त शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला आणि १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमधील ही सर्वात मोठी चूक असल्यामुळे गृहमंत्रालयने निवेदन जारी करून पंजाब सरकारकडून या घटनेसंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीची नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे आंदोलन मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवन परिसरात झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपच्या या युवा मोर्चामध्ये मुलींचा देखील समावेश होता. काँग्रेस ज्याप्रकारे पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वागले, ही लोकशाहीची हत्या आहे. यामधूनच काँग्रेसचा खरा चेहरा दिसून आला. काँग्रेस सर्वात मोठा गद्दार पक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही काँग्रेसमुक्त भारत होणार नाही, तोपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाला सोडणार नाही, असे भाजपच्या युवा मोर्चातील कार्यकर्त्याने मत मांडले.

मुंबईप्रमाणे नागपुरातही भाजप युवा मोर्चाने आंदोलन केले. पंजाब सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत हे आंदोलनक करण्यात आले. यावेळी देखील पोलीस आणि आंदोलनांमध्ये झटापट झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button