खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यासह अधिकाऱ्यांवर आरोप
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यासह पोलीस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी हे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या नेते यांच्यावर कट रचून डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळण्याच्या हेतूने दबाव आणणे यासह ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मरीन ड्राइव्ह येथील ग्रीन साउथ हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी डेलकर यांनी आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये पटेल यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी नमूद केले होते. लेटर हेडवर लिहिलेल्या १६ पानी सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाइड नोटमधील हस्ताक्षर हे मोहन डेलकर यांचेच असल्याचेही निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली आहे.
डेलकर यांची पत्नी व मुलगा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेत लवकर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.