राजकारण

स्कॉर्पिओतील स्फोटके प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे आहे?; असीम सरोदेंचा सवाल

सचिन वाझे प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप

पुणे : रिलायन्सचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी वकील असीम सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अंबानींच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली या प्रकरणात अंबानी यांनी तक्रार केली आहे का? अंबानींनी केलेली तक्रार कुठे आहे? असा सवाल असीम सरोदे यांनी केला आहे. हा सवाल करताना सचिन वाझे प्रकरणात राजकारणच अधिक होत आहे, असंच दिसतंय, असं असीम सरोदे म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. यामध्ये अंबानी यांनी लेखी तक्रार केली आहे का? पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा अंबानी यांनी त्यांचंच स्टेटमेंट दिलं आहे का? हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्याविरोधात कट रचला गेलाय त्यांची स्टेटमेंटच नाही आहे. त्यामुळे या प्रकरणात मला बेकायदेशीरपणा आणि राजकारण होत असल्याचं दिसून येतंय, असं सरोदे म्हणाले. सचिन वाझे प्रकरणावर बोलताना त्यांनी सचिन वाझेंच्या कारवाईत राजकारण जास्त दिसतंय. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जातोय, असं सांगतानाच खरंतर एनआयएनं राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणं अपेक्षित आहे, असं सरोदे म्हणाले. तसंच, वाझेंना अटक झाली आहे त्यामुळे आता ते नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतात. त्यांची चौकशीसाठी गरज नसेल आणि ते तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहेत, असं जर न्यायालयाला वाटलं तर त्यांना जामीन मिळू शकतो, असंही सरोदे यांनी स्पष्ट केलं.

असीम सरोदे यांनी वाझे यांच्या कोठडीवर प्रतिक्रिया दिली. “चौकशी कशी करायची, याची जाणीव राष्ट्रीय तपास यंत्रणेला आहे. त्याबाबत नियमावली आहे. संबंधित व्यक्तीसोबत अमानुष वागणूक करता येत नाही. कोणतीही जबरदस्ती न करता चौकशी करण्याचे अधिकार आहेत. पुढच्या काही दिवसात आणखी काही जणांना अटक होईल, असं वाटतंय. पण तंस झाल्यास पोलिसांचं मनोबल खच्चिकरण होईल. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद असावेत. त्यांच्यात राजकीय संघर्ष जरुर व्हावा. कारण राजकारणाचा तो भाग आहे. पण कोणत्याही यंत्रणेला त्यात गोवणं आणि नंतर अराजकीय करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही पक्षाची सत्ता असो त्यांनी कायदा मोडतोड करुन वापरणं हे जास्त आक्षेपार्ह आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सचिन वाझे यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांना शिक्षा मिळेल. परंतु, त्यासाठी काही सुमार दर्जाचे नेते नार्को टेस्टची मागणी करत आहेत. नार्को टेस्ट करणं हे बेकायदेशीर आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं संगितलं आहे. जवळपास सात निर्णयांमध्ये न्यायालयानं हे सांगितलं आहे. मानवी हक्क आयोगानेही नार्को टेस्ट बाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यामुळे नार्को टेस्ट होऊ शकत नाही. अशा नेत्यांनी चुकीची मागणी करून लोकांना अज्ञानाकडे नेऊ नये, असं सरोदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button