राजकारण

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा : राज ठाकरे

मुंबई : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं उघडण्यासाठी सूट द्या, खेळाडूंना जीम, स्वीमिंग पूलमध्ये सवलत द्या, बँकाची जबरदस्ती वसुली थांबवा अशा विविध मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल झूम मीटिंगद्वारे झालेल्या चर्चेचा तपशील यावेळी सांगितला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणं सांगितली. राज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही कारणं मांडली असून त्यावर उपाय करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेला विकेंड लॉकडाऊन आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आमचं बोलणं झालं. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली, असं राज ठाकरे म्हणाले.

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात पेशंटची संख्या वाढत आहे. आधी पेक्षा ही लाट सर्वाधिक मोठी आहे. महाराष्ट्रातच कोरोनाची सर्वात मोठी लाट का आहे? असं मुख्यमंत्र्यांना मी विचारलं. परंतु याबाबतच्या खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येत असतात. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होतात, शेतकऱ्यांचे मोर्चेही सुरू आहे. तिथे कोरोनाची लाटबिट नाही. फक्त महाराष्ट्रातच आहे, असं राज म्हणाले.

नजीब मुल्लावर कारवाई करा

मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली , उत्तर प्रदेश पर्यंत तपास करण्यात आला, यात राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. सत्ताधारीची लोक दिवसा ढवळा लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आहे. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय.. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात बांधिल नसतात.खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही, नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज यांच्या सूचना

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या झूमच्या मिटींगवर राज यांनी काही सूचनाही मांडल्या. जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं? त्यामुळे दोन-तीन दिवस विक्रीसाठी उद्योग सुरु ठेवण्याची परवानगी द्या, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?, त्यात ग्राहकांना सवलत द्यावी, तसेच लॉकडाऊन काळात सरसकट वीजबिल माफ करावं, जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं, लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं. मी सूचना केली, त्यांना घ्या. पालिकेत कायमस्वरुपी सामावून घ्या. तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही, जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल, शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत आदी सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या असून त्यांनीही या सूचना योग्य असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.

अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं, विषयाला फाटा नको

राज ठाकरे म्हणाले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी ठेवली कुणी हा खरा महत्त्वाचा विषय आहे. त्याची चौकशी होणार आहे का? उद्या याने राजीनामा दिला चौकशी सुरु झाली, मग तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग सगळेच विसरुन जाणार. विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असं कृत्य करणार नाहीत. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी. आपण तिसरीकडे जातोय. प्रत्येक वेळी हेच होते. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही.

परमबीर सिंगांना बदलीनंतर साक्षात्कार

परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच.

उद्धव ठाकरे सकारात्मक वाटले

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना सकारात्मक असल्याचे म्हटले. प्रसारमाध्यमांनी कोरोनासंदर्भातील खरी परिस्थिती दाखवावी. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button