प्रियंका गांधींची देवेंद्र फडणवीसांवर टीका

नवी दिल्ली: प्राण वाचवण्यासाठी रेमडेसिवीर मिळावी म्हणून लोक वणवण भटकत आहेत. त्याचवेळी एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे, अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धारेवर धरतानाच व्हिडीओही पोस्ट केला आहे. जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे.
दरम्यान, भाजपने प्रियंका गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी यांनी थोडा अभ्यास करून बोललं पाहिजे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन आणि बेडही मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे. प्रियंका गांधी यांनी किमान महाराष्ट्र सरकारकडून तरी याचा हिशोब मागितला पाहिजे, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि आता प्रियंका गांधी फडणवीसांवर ट्विट करून टीका करत आहेत. हे लोक फडणवीसांना घाबरत आहे का? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तर, प्रियंका यांनी अज्ञानापोटी माहिती नसताना वरिष्ठ नेत्यावर टीका केली आहे. त्यांचं वक्तव्य कीव करण्यासारखं आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार झाला असेल तर पकडा आणि जेलमध्ये टाका, असं आव्हानच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे.




