मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे : मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं जोरदार आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भर पडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेतील कारभारावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ब्रिटिशांनी सगळं मुंबईत केलं, पण शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात देखील ते सत्तेत आहे. तसेच ४० हजारांचे त्यांचं बजेट असते. ५८००० कोटींच्या ठेवी आहे, तरीदेखील मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहे. येत्या महापालिकेत मुंबईकर शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवतील, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.
मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? याआधी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही. मुंबईकर जनता यावेळी शिवसेनेला माफ करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.




