
सोलापूर : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी पडळकर ताफ्यावर दगडफेड झाली. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर येथे ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे.
महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही.
घोंगडी बैठक उरकुन बाहेर आलो होतो. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा ४-५ लोक होते. अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.
पडळकरांची शरद पवारांवर टीका
पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं पडळकर म्हणाले होते. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत असे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असं पडळकर म्हणाले होते.
पडळकरांना प्रत्युत्तर
पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत, त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.




