
मुंबई: कुस्तीपटूंच्या विविध समस्यांसंदर्भात सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या दीपाली भोसले सय्यद यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेऊन दीपाली भोसले सय्यद यांनी कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कोरोनामुळे कुस्तीपटूंचे होत असलेले नुकसान व अन्य गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. रखडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र शासनाने तत्काळ सुरू करावी, अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली.
याप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी व महापौर केसरी पैलवान अमृत मामा भोसले उपस्थित होते. त्यांनी कुस्तीगीरांच्या समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. पवारांनी लगेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांना फोन केला व दोन दिवसात निर्णय घेण्यासाठी शासन पातळीवरून हालचाली होतील, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले कुस्तीगीर फाऊंडेशनचे सर्व कार्यकारणी व महाराष्ट्र केसरी व आंतराष्ट्रीय महिला कुस्तीपटु उपस्थित होत्या




