Top Newsराजकारण

राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली होणार !

मुंबई : राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे येत्या ७ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. दरम्यान, घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.

दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघाडावीत यासाठी भाजप, मनसे तसेच विविध संघटनांनी आंदोलने केली होती. भाजपने राज्यभरात घंटानाद केला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील दहा दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भरो आंदोलन करा. मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा राज्य सरकारला दिला होता.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून समाधान व्यक्त

राज्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकाने, मॉल्स आदी सुरु करण्यात आले. मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्य जनतेत राज्य सरकारविरोधात नाराजी वाढत होती. भाजप, मनसेसह अनेक संघटनांनी राज्य सरकारविरोधात घंटानाद आंदोलनं केली. तरिही राज्य सरकारनं मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला नव्हता. गणेशोत्सव काळातही मंदिरे बंदच ठेवण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवानंतरच्या स्थितीचा आढावा घेत आज राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button