नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत काल देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला होता. त्यानिमित्त देशभरात काल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये गुरुवारपर्यंत कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोविडबाबतच्या पुढील टप्प्यातील लढाईचा आराखडा मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पंतप्रधान काय बोलतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहेत.
कोरोनाप्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला. अवघ्या दहा महिन्यांत भारताने ही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक डोस देण्यात आले असून, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डाॅ. राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले. तेथील लसीकरण केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि लसीकरणाबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी या निमित्ताने देशभरातील सर्व डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेदेखील होते.