कोल्हापूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुढील महिन्यात मराठा स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबर रोजी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे. त्यामुळे, राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी आता स्वराज्याची राजधानी सजणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारीही लवकरच सुरू होईल.
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.@rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 25, 2021
दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, आता राष्ट्रपती लवकरच रायगडला भेट देणार आहेत.