राजकारण

संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहे का? – प्रवीण दरेकर

मुंबई: शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) कधीही पुढे आले नाहीत. मात्र, आता ते अनिल देशमुख यांचे भक्कम समर्थन करुन राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी इमाने-इतबाहेर करत आहेत. त्यामुळे संजय राऊत नक्की शिवसेना की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असा खोचक सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची गरज नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला. संजय राऊत यांचे वक्तव्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ता केलंय की काय, अशी शंका वाटते. संजय राठोड यांचे कृत्य चुकीचेच होते. पण त्यावेळी संजय राऊत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यावेळी चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा आवश्यक वाटला. तेव्हा चौकशीसाठी राजीनामा आवश्यक नाही, असे राऊत यांना सांगावेसे वाटले नाही. त्यावेळी राऊतांनी संजय राठोड यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, हे माहिती नाही. मात्र, आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पाठराखण इमाने-इतबारे करताना दिसत आहेत, अशी टिप्पणी प्रवीण दरेकर यांनी केली.

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का : नाना पटोले
संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही. तेव्हा संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयावर बोलू नये, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button