प्रवीण परदेशी यांची ठाकरे सरकारला धोबीपछाड
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. कारण नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवीण परदेशी यांना ठाकरे सरकारने मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिल्यानंतर, अवघ्या काही तासातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर परदेशी हे केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनचे सदस्य म्हणून प्रशासनात रुजू झाले आहेत.
कोरोना काळात ठाकरे सरकारने प्रवीण परदेशी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन हटवलं होतं. त्यानंतर त्यांची अन्य विभागात बदली झाली. मग परदेशी हे राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत होते. पण इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. यानंतर ठाकरे सरकारने कालच ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी प्रवीण परदेशी यांना मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली होती. मात्र परदेशींनी अवघ्या काही तासातच राजीनामा देऊन, केंद्रात जाणे पसंत केलं. ठाकरे सरकारने मे २०२० मध्ये तत्कालिन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली होती. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती.