साहित्य-कला

प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव’ फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी 1942 साली चले जाव आंदोलनाची हाक दिली,आणि त्यानंतर ब्रिटीशांनी त्यांच्यासह अनेकांची धरपकड केली. गांधीजीना त्यावेळी पुण्यातल्या आगा खान पॅलेस इथे स्थानबद्ध करण्यात आले होते . आपल्या प्रेरणादायी स्वातंत्र्यलढयाच्या या स्मृती आजही प्रत्येकाला रोमांचित करतात. याच  ऐतिहासिक आगा खान पॅलेसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक सुंदर फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या  कार्यक्रम मालिकेचा  भाग असलेल्या या उपक्रमाचे आज केंद्रीय  माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क विभागातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते 15 मार्च 2021पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात, पॅनेलच्या माध्यमातून, स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या नेत्यांचे विचार-कार्य मांडले जात आहे. यात महात्मा गांधी, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा प्रभूतींचा समावेश आहे.

मोठ्या बलिदानातून आपल्याला आपले स्वातंत्र मिळाले आहे, त्यामुळेच, प्रत्येकाने स्वातंत्र्यलढ्याचा हा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे, असे यावेळी जावडेकर यांनी सांगितले. आपला  दैदिप्यमान स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या तेजस्वी कथा आजच्या पिढीतील सर्वांपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून पोहोचाव्यात या हेतूनेच, देशभरात  विविध ठिकाणी ही प्रदर्शने भरवण्यात आली आहेत, असे यावेळी आभासी पद्धतीने उद्घाटन करतांना जावडेकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे उद्दिष्ट स्वतंत्र भारतातील विविध उपलब्धी आणि यश जगासमोर आणणे हे ही आहे. त्यासोबतच, आगामी 25 वर्षातला भारत कसा असेल, याची कल्पना करून, सुराज्याच्या दूरदृष्टीनुसार सर्वच क्षेत्रात भारताला पहिल्या क्रमांकावर नेण्याची योजना बनवण्याचा सुद्धा मानस आहे, असेही  जावडेकर म्हणाले.

हे उद्घाटन केल्यानंतर दिल्ली येथील मिडीया सेंटरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमातही जावडेकर ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. पुण्यासह देशात आणखी पाच ठिकाणी आयोजित फोटोप्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. मोईरंग (मणिपूर), भुवनेश्वर(ओडिशा), सांबा(जम्मू),पटना(बिहार) आणि बंगळूरू(कर्नाटक) याठिकाणी ही प्रदर्शने भरवण्यात आली आहेत.

सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, आणि आपल्या मनात एक इतिहासाचा संस्मरणीय धागा इथून घेऊन जावा” असे आवाहन यावेळी जावडेकर यांनी केले.

या प्रदर्शनाचा हेतू, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि कर्तृत्वाला अभिवादन करणे हा आहे. त्याशिवाय, देशाच्या विविध भागात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, अनाम वीरांचा संघर्ष जगासमोर आणणे हा ही यामागचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव, अमित खरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या लोकसंपर्क विभागाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी प्रसारमाध्यमांना या प्रदर्शनाची माहिती दिली. सर्व पुणेकरांनी, विशेषतः युवकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करत, तो त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरेल, असे मगदूम यावेळी म्हणाले.

आगा खान पैलेस हे अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक स्थान असून इथेच महात्मा गांधीना ब्रिटीश सरकारने 1942 साली 21 महिने नजरकैदेत ठेवले होते. ‘चले जाव’ च्या चळवळीचे केंद्रबिंदू ही हा पैलेस होता. आता या ठिकाणी असलेल्या वस्तूसंग्रहालयात, गांधीजी ज्या खोलीत राहायचे,ती खोली जतन करून ठेवली आहे, ज्यात त्यांच्या या 21 महिन्यांच्या वास्तव्यातील सर्व तपशील या प्रदर्शनात बघायला मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button