ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचे पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
मराठी साहित्य विश्वातील विनोद लेखनाची परंपरा द.मा. मिरासदार यांनी पुढे आखणीन वाढवली. विनोदी लेखनीसह तेवढ्याच खुमासदार पद्धतीने कथाकथन करण्यासाठी ते ओळखले गेले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रिकुटाचं कथाकथन मराठी जनांसाठी आवडीचं केंद्र असायचं. द.मा. मिरासदार यांचं कथाकथन संपूर्ण महाराष्ट्राभर तर होतंच असायचं. परंतु महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही द.मा. मिरासदार यांनी कथाकथन केलं आहे. पुण्यातील सहकार नगरमधील राहत्या घरी आज द.मा मिरासदार यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९५व्या वर्षी मिरासदार यांचं निधन झालं.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनांची परंपरा मिरासदार यांनी पुढे सुरू ठेवली होती. शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाचे आणि उत्तम सादरीकरणामुळे श्रोत्यांच्या मनात कायम कोरल्या गेल्या आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही मिरासदार यांनी वढवली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा जीवनगौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार आणि पु.ल.जीवनगौरव सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी मिरासदारांना गौरवण्यात आलं आहे.




