Top Newsराजकारण

दिल्लीत पंतप्रधान मोदी – शरद पवारांची भेट; तासभराच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण

मोदींना भेटण्यापूर्वी पवार - फडणवीसांची चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात गेले. मोदी आणि पवार यांच्यात पंतप्रधान कार्यालयात जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या भेटीगाठींमध्ये प्रशासकीय स्वरुपाच्या चर्चा होतात असा एक संकेत आहे. त्यामुळे या बैठकीत सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्राकडून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. या खात्याची जबाबदारी अमित शहांकडे सोपवण्यात आली. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. ही पार्श्वभूमी पाहता याबद्दल आजच्या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि लडाखमधील सीमावर्ती भागातील चीनच्या हालचाली हे दोन मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. विरोधक हे दोन्ही मुद्दे अधिवेशनात लावून धरू शकतात. त्याच अनुषंगाने मोदी-पवारांची भेट झाल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी निवड झालेले पियूष गोयल यांनी कालच पवारांची भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील पवारांची भेट घेत त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली. त्यामुळे संसदेत चीन आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फारसा चर्चिला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. पवार थेट पंतप्रधानांच्याच भेटीला आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीला अनेक राजकीय कंगोरे असल्याचंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक पवारदेखील त्यांच्यासोबत होते. या तिन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर मोदी आणि ठाकरेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट संवाद झाला. आता मोदी आणि पवारांची भेट झाली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या दोन नेत्यांच्या पक्षप्रमुखांशी मोदी थेट संपर्क ठेवून असल्याचं दिसून आलं आहे.

मोदींना भेटण्याआधी पवार – फडणवीसांची चर्चा

दरम्यान, मोदींची भेट घेण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत होती. दिल्लीत त्यांनी नव्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा किती तास चालली?, कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

फडणवीस आणि पवार दिल्लीत भेटल्याने या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीत सहकारावर चर्चा झाली असून साखर कारखान्यांवर होत असलेल्या कारवाईवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असंही बोललं जात आहे. मात्र, हे सर्व तर्क असून त्याला दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button