Top Newsराजकारण

पालखी मार्गाच्या भूमीपूजनाचे श्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या भूमिपूजन

पंढरपूर : केंद्र सरकारकडून वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या १० हजार कोटीच्या पालखी मार्ग शुभारंभ सोहळा उद्या पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे. या मार्गाचे श्रेय मिळविण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी याचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होता .

मात्र यापूर्वी गडकरी यांच्या मंत्रालयाकडून महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसह इतर राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हे कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याचा आक्षेप घेत भाजप नेत्यांनी रद्द करायला लावला आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्याचा घाट घातला असे म्हटले जात आहे. आता उद्या पंतप्रधानांच्या हस्ते हा कार्यक्रम होत असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांना यात श्रेय मिळणार नसल्याने अद्याप राज्यातील कोणत्याच नेत्याचे उपस्थितीबाबत निश्चित ठरवण्यात आलेले नाहीत. भाजपाला वारकरी संप्रदायाला खुश करणारा हा कार्यक्रम पूर्णतः भाजप नियंत्रित ठेवायचा असून यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोरे आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण असताना केवळ ३ हेलिपॅडची व्यवस्था केल्याने केवळ गडकरी, फडणवीस आणि व्ही के सिंग एवढेच मान्यवर सोहळ्याला हजेरी लावणार हे नक्की झाले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ द्वारे संबोधित करणार असून पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार याना निमंत्रण दिले आहे. आता व्यासपीठावर बहुतांश भाजप नेते उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रमाचे श्रेय घेण्याचा भाजपचा उद्देश सफल होताना दिसत असल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदींच्याहस्ते या पालखी मार्गाचे व्हर्च्युअल भूमीपूजन होणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वार महाराज पालखीमार्ग २२१ किमी, तर १३० किमी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस ते तोंडले-बोंडले असा असणार आहे.

आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button