ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा पवारांना अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज : मुनगंटीवार
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी औरंगाबादेत आयोजित एका कार्यक्रमात भाजपसोबत्या युतीबाबत एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरु असताना अशा वक्तव्याची गरज काय? असा पवार म्हणाल्याचंही कळतंय. अशावेळी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे.
शरद पवार यांना उध्दव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज आहे, अशी खोचक प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे. तुम्हाला तर जनतेने निवडणुकीत नापास केलं होतं. तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरचं नाव खोडून स्वतःचं नाव टाकलं आणि सत्ता आली म्हणून सांगत आहात, अशी तिखट टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जनता तुमच्यावरची नाराजी व्यक्त करेल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना लगावलाय.
युती भाजपने तोडली हे २१ व्या शतकातील आठवे आश्चर्य असल्याचं खोचक वक्तव्यही त्यांनी केलंय. निकाल लागताच भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका घेतली. त्यातून शिवसेनेने आपला खरा चेहरा दाखवला. शिवसेनेनं बेईमानी केली असून ती अधिक काळ चालणार नाही. पुढील निवडणुकीत जनता त्यांची लक्तरं वेशीवर टांगेल, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केलाय.
‘खूप लोकांना इकडे यायचे आहे’, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ गंमत सुरू असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. सध्या या राजकीय गमती जमतीचा स्तरही अत्यंत खालावला आहे. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार फुटणार असल्याचं वक्तव्य केलं होते. मात्र, आव्हान देऊन देखील हे शक्य झाले नाही. शिवसेनेचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणातील पीजे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.